जेव्हा वाचनालय होते वखार, तेव्हा जनतेलाच करावा लागतो त्यात सुधार

जेव्हा वाचनालय होते वखार, तेव्हा जनतेलाच करावा लागतो त्यात सुधार

संभाजी ब्रिगेड व मनसेच्यावतीने ४ सप्टेंबर  रोजी डॉ. भालचंद्र वाचनालयाचे केले जाणार “प्रतिकात्मक उद्घाटन” व “प्रतिकात्मक वाचन” : सेवकराम जाधव, वैजनाथ कळसकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील वाचन संस्कृतीचे माहेर घर असलेले “भालचंद्र वाचनालय” हे जुन्या इमारतीतून नवीन इमारतीमध्ये जाण्याच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांपासून बंद आहे. नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत एक दशक परळीची “वाचन संस्कृती” मोडीत काढली गेली. यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नगर परिषद प्रशासनास करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी भालचंद्र वाचनालयाच्या जागेत “प्रतिकात्मक उद्घाटन” व “प्रतिकात्मक वाचन” आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन मंगळवार २९ ऑगस्ट रोजी दोन्ही पक्षांच्यावतीने नगर परिषद प्रशासनास देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर , विठ्ठल विठ्ठल दादा झिलमेवाड, पांडुरंग मोरे, विद्याधर सिरसाठ,अंनत सोळंके, भागवत गायकवाड, आदी उपस्थित होते.

कोणत्याही शहराची जडणघडण होते त्यात शैक्षणिक व साहित्यिक वर्तुळाचा मोठा हातभार असतो. सुजाण नागरिक घडविण्यासाठी त्यात मोलाचे योगदान असते ती शहरातील वाचनालय व अभ्यासिकांची.

२००९ सालाच्या आसपास वाचनालयाची परवड सुरू झाली. नगर परिषद वास्तूचे काम सुरू करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून नगर पालिका कार्यालय डॉ. भालचंद्र वाचनालय वास्तूत हलविण्यात आले. भव्यदिव्य व्यवस्था असलेल्या वाचनालयाला आकुंचित व्हावे लागले.

साधारणपणे ५६ हजार इतकी विपुल संपदा असलेल्या वाचनालयाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम साधारणपणे ऑगस्ट – सप्टेंबर २०१६ पासून सुरू झाले. त्यामुळे वाचनालय नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील शिक्षक भवनात हलविण्यात आले, जे आजही तिथेच आहे. जिथे दहा जणांना बसण्याचीही सोय नाही.

साधारणपणे २०१६ साली सुरू झालेल्या वाचनालय नूतनीकरण प्रकल्पानुसार “डॉ. भालचंद्र वाचनालय व साहित्यिक व्यापारी संकुल” या संकल्पने अंतर्गत वाचनालयाची इमारतीचे नवनिर्माण करणे. वाचनालय अद्ययावत करून डिजीटलायझेशन करणे. अभ्यासिका, वाचनकक्ष, ई – लायब्ररी, कीडस लायब्ररी, कलाप्रेमींसाठी आर्ट गॅलरी आदींचे निर्माण करणे. सोबतच व्यापारी संकुलात साहित्य व साहित्याशी निगडीत दुकानांसाठी संकुल बांधले जाणार होते. प्रकल्प घोषीत केला तेव्हा १ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च यासाठी प्रस्तावित होता.

मात्र, नोव्हेंबर २०१६ नंतर गठीत झालेल्या नगर परिषदेचा विहित काळ नोव्हेंबर २०२२ मध्ये संपला. याचा अर्थ साडे चार वर्षांचा काळ पूर्ण होऊनही प्रकल्प रखडलेला आहे. नगरसेवक गुत्तेदार महोदयांनी तर विविध साईटचे बांधकाम साहित्य, वाहने तिथे जमा करण्याचा सपाटाच लावला आहे. एकप्रकारे वखारीचे स्वरूप त्याला आहे.

एकेकाळी तब्बल पाच हजार सभासद होते तो आकडा सद्यस्थितीत वाचनालयाचे जेमतेम १०० सभासद आहेत. लाख, सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरांत ५६ हजार ग्रंथसंपदा असून फक्त १०० सभासद असणे हे कशाचे लक्षण म्हणावे?

तैलात रक्षेत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात।
मूर्ख हस्ते न दातव्यम्, एवं वदति  पुस्तकम्।।

पुस्तक म्हणते : माझे तेलापासून रक्षण करा, पाण्यापासून रक्षण करा, माझी शिवण (binding) उसवू नका देऊ. इतके जर केले तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूर्खाच्या हाती मला सोपवू नका. कदाचित डॉ. भालचंद्र वाचनालयातील ग्रंथही तर हे म्हणत नसतील?

उल्लेखनीय बाब म्हणजे १९७८ – ८० दरम्यान राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या सुंदरराव सोळंके यांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या टुमदार इमरतीचे लोकार्पण केले गेले. डॉ. भालचंद्र वाचनालयाला उत्कृष्ट दर्जाचे काम म्हणून दोनदा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व वाचनप्रेमी नागरिकांना अपेक्षा आहे की २००९ पासून सुरू झालेला वनवास संपून वखार झालेल्या डॉ. भालचंद्र वाचनालयाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात तसा “पुनःश्च हरिओम” होईल.

लवकरात लवकर डॉ. भालचंद्र वाचनालयाचे लोकार्पण होण्याची गरज ओळखून संभाजी ब्रिगेड व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला संबंधित आंदोलन हे पूर्णपणे लोकशाही मार्गाने असेल अशी माहिती दोन्ही पक्षांच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळाली आहे.

Related Articles

Latest Articles