शिक्षणप्रेमी व समाजहीत दक्ष राजे छत्रपती शाहू महाराज.

शिक्षणप्रेमी व समाजहीत दक्ष राजे छत्रपती शाहू महाराज.

– साभार :- परमेश्वर बनकर, बीड 9503288282

जाती जातीत विभक्त झालेल्या आणि स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रवाहात आणून,त्यांना त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव निर्माण करून,त्यांच्या मध्ये स्वाभिमानाची पेरणी करणारे महान राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज,छत्रपती शाहू महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे.त्यांचा जन्म 26 जुन 1874 मध्ये कोल्हापूर येथे झाला,आई राधाबाई व वडील आबा साहेब घाटगे,कोल्हापूर संस्थानचे चौथे छत्रपती शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी छत्रपती शाहू महाराजांना 17 मार्च 1884 मध्ये दत्तक घेतले. पुढे 1 एप्रिल 1891 मध्ये महाराजांचा विवाह बडोद्याचे गुणाजी पंत खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्या सोबत झाला.2 एप्रिल 1894 मध्ये त्यांच्या राज्यरोहन सोहळा पार पडला आणि कोल्हापूर संस्थानची सूत्रे महाराजांच्या हाती आली.ही पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे.
19 व्या शतकामध्ये शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रचार आणि महत्व समाजाला पटू लागले होते त्याच काळात शिक्षण घेण्याचा योग महाराजांना आला.त्यामुळे महाराज हे सुशिक्षित राजे झाले.शिक्षणामुळे त्यांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली.
1899 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक प्रकरण घडलं जे वेदोक्त प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांच्या संस्थानामध्ये विधी करायला असलेले नारायण भटजी यांनी महाराज पंचगंगे मध्ये स्नान करत असताना वेदोक्त मंत्राच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले, भागवत शाश्त्री म्हणून महाराजांच्या सहकाऱ्याने ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आणून दिली, सदरील गोष्टीबद्दल महाराजांनी विचारणा केली असता नारायण भटजी यांनी महाराजांना उलट उत्तर दिले कि शुद्रांसाठी पुराणोक्त मंत्र असतात, आणि राजे तुम्ही सुद्धा शूद्रच आहात, नारायण भटजीचे हे वाक्य ऐकून महाराजांना राग आला, महाराजांनी विचार केला कि मी राजा असताना माझ्यासोबत असा दुरव्यवहार केला जात असेल तर सर्वसामान्य रयतेचे काय? या घटनेनंतर खऱ्या अर्थाने शाहू महाराज परिवर्तनाच्या दिशेकडे वळले, जुलै 1902 मध्ये आपल्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला.
अस्पृश्यतेच्या विरोधात जनजागृती केली, अस्पृश्यांना हॉटेल, दुकानें, शिवण यंत्र, इत्यादी व्यवसाय उभा करून दिले, गंगाधर कांबळे नावाच्या अस्पृश्य व्यक्तीला हॉटेल सुरु करून दिले व स्वतः त्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी महाराज जात असत. ही गोष्ट आपल्याला वाचायला सोपी वाटते परंतु मनूव्यवस्थेच्या विरोधात काम करणे हे तेंव्हा ही सोपं नव्हतं आणि आता ही सोपं नाही.पुरोगामी विचारधारेमुळे शाहू महाराजांवर देखील अनेक वेळा जीव घेणे हल्ले झाले होते. तरीही शाहू महाराज डगमगले नाही. अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून सवर्ण व अस्पृश्यांच्या एकत्र शाळा सुरु करण्याचे काम महाराजांनी केले. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला,1917 मध्ये विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा करून विधवांना स्वातंत्र्य बहाल करण्याचे काम महाराजांनी केले.
आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत अश्या पालकांना आर्थिक दंड करण्याचा कायदा केला. बहुजन समाजाच्या मुलांसाठी महाराजांनी वसतिगृह स्थापन केले. कोल्हापूर आजही वस्तीगृहाची जननी म्हणून वळखले जाते.बहुजन समाजाला राजकीय प्रक्रियेत सहभागी होता यावे म्हणून 1916 मध्ये निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ची स्थापना केली.
1911 मध्ये महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची कोल्हापूर येथे शाखा सुरु करून सत्यशोधक समाजाचे कार्य महाराजांनी सुरु ठेवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी व वृत्तपत्रासाठी महाराजांनी मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोलाचं सहकार्य महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांचे बहुजन समाजाबद्दलच्या कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात कि छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सणा प्रमाणे साजरी करा.परंतु आजही छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होताना दिसत नाही.
जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले परंतु रयतेशी नाळ जोडले गेलेले मोजकेच राजे होऊन गेले त्यापैकी एक नाव म्हणजे छत्रपतीशाहू महाराज, महाराजांनी 1894 ते 1922 पर्यंत एकूण 28 वर्ष राज्यकारभार केला सदरील कालावधी मध्ये महाराजांनी संस्थानात अनेक सामाजिक धार्मिक व राजकीय सुधारणा घडवून आणल्या, बहुजन समाजाच्या हिताचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून शाहू महाराजांचा उल्लेख माणसातला राजा आणि राजातला माणूस असा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. लोकशाहीला प्रेरक असं राज्यनिर्माण करणाऱ्या या लोकशाही व मानवता प्रिय राजाच्या जयंती दिनी मानाचा मुजरा.

Related Articles

Latest Articles