अंबाजोगाई पोलिसांच्या उदासीन भूमिकेमुळे न्यायासाठी पीडित महिलेची थेट गृहमंत्र्यांकडे धाव दिंद्रुड:चार मुली असल्याच्या कारणामुळे बळजबरीने घरात कोंडून दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून चार मुलींसह पीडीतेला जबर मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न करून शारिरीक व मानसिक हिंसाचार केल्याबाबत सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दिंद्रुड येथील माहेरवासीन पीडितेने थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील आरशीया असद शेख या माहेरवाशीण महिलेचा नोव्हेंबर 2011 साली अंबाजोगाई येथील असद मिट्टू शेख या युवकासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर चार मुलीच झाल्याचा राग मनात धरून पाचव्यांदा दोन महिण्याची गर्भवती असलेल्या आरशिया या महिलेस नवरा असद सह सासरा मिट्टू शेख, सासु लतिफा शेख,दिर शाहिद शेख या लोकांनी गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून एका बंद खोलीत चार मुलींसह डांबून ठेवत जबर मारहाण केली. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने या महिलेचा गर्भपात झाला असून आई-वडिलांसह पीडितेने अंबाजोगाई येथील शहर पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंद करण्यासाठी गेली असता उपचारार्थ आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. उपचारानंतर तक्रार देताना पोलिसांनी सासरच्या मंडळीकडून पैसे खाऊन साधी एनसी दाखल करत पीडीतेला हाकलून दिले असल्याची तक्रार पीडित महिलेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.लाकडाचा मोठा अड्डा टाकण्यासाठी माझ्या माहेरच्या नातेवाईकांकडुन नऊ लाख रुपये घेऊन ये म्हणून मला घराबाहेर हाकलून दिले व माझ्या होणाऱ्या बाळाचा बळी सासरच्या लोकांनी घेतला असल्यामुळे सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिडीतेने केली आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात*
पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात करून तिला जबर मारहाण करत तिच्या चार मुलीसह तिच्या आई वडिलांना देखील जीवे मारण्याचा प्रयत्न करून देखील साधी एन सी दाखल केल्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांची माणुसकी हरवली आहे का?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.