बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा ‘हा’ मोठा निर्णय; सरकारला घाम फुटणार!

बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा ‘हा’ मोठा निर्णय; सरकारला घाम फुटणार!
बीड: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दि.6 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत दि.4 सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे.
बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मराठा समाजातील सर्व क्षेत्रातील मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर सर्वानुमते मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यामध्ये दि. 6 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहीत छोट्या-मोठ्या रस्त्यावर गावनिहाय चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे. आज (दि.5) आंदोलनाची सविस्तर नियमावली दुपारी 3 वाजेपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना दिली जाणार आहे. सदरील चक्काजाम हा पूर्णतः लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या तरूण मराठा बांधवांनी समाजावर होत असलेल्या अन्यायकारक गोष्टींचा उहापोह करत अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. तर समाजाला येणार्‍या अडचणी कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजे, कायदेशीर मार्गाने कसे जावे लागेल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बैठकीत सर्वानुमते पारित झालेले ठराव
1) दि.5 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातून बहुसंख्य मराठा बांधव अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चार चाकी वाहनांची रॅली निघणार आहे. (2) दि. 6 सप्टेंबर रोजी गावनिहाय चक्काजाम केला जाणार आहे. 3) मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या कुठल्याही नेत्यांना मतदान न देण्याचा निर्णय घेण्यात आला. 4) राज्य व राष्ट्रीय महिला आयोगाकडे अंतरवाली सराटी या ठिकाणी महिलांवर झालेल्या अमानुष लाठीमाराची तक्रार करून दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करण्यात येतील. 5) महाराष्ट्र शासनाने कुणबी प्रमाणपत्रासाठी स्थापन केलेल्या अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या दौर्‍यादरम्यान पुरावे सादर करणे.

Related Articles

Latest Articles