सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता अदा करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन

बीड दिनांक 19 जून: राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रलंबित तिसरा हप्ता आणि नियमित चौथा हप्ता अदा करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता अदा करण्याचे शासनादेश निर्गमीत करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता प्रलंबित आहेत. सरकार शासनादेश काढून थकबाकी अदा करण्याचे आदेश देते परंतु अधिकारी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगून थकबाकीचे हप्ते जमा करत नसल्याच्या दुष्टचक्रात खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी अडकला आहे. भविष्य निर्वाह निधीत जाणा-या या रकमेवर शिक्षकांकडून व्यवसाय कर कापून घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचा-यांना थकबाकीचे हप्ते वेळेवर अदा केले जातात मात्र खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे. याची ताबडतोबीने दखल घेऊन पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रलंबित तिसरा आणि नियमित चौथा हप्ता अदा करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, कोषाध्यक्ष औताडे ए. बी., सहसचिव श्री माळी एन. जी. यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Latest Articles