बीड : तालुक्यातील आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंझरी हवेली येथे दिनांक 15 6 2023 रोजी प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक-2 संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठया आनंदामध्ये संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची केळी आणि नारळांनी, फुग्यांनी सजवलेल्या, नटवलेल्या बैलगाडीतून संपूर्ण गावकऱ्यांसोबत, ढोल, ताशांच्या, हलगीच्या गजरामध्ये संपूर्ण गावातून प्रभात फेरी द्वारे मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शालेय परिसर फुगे, रांगोळी, पताका अशा वेगवेगळ्या साहित्याने नटून ,सजून या नवीन प्रवेश पात्र मुलांच्या व नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिल्याच दिवशी शाळेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला होता. संपूर्ण गावातून बैलगाडीतून मिरवणुकीद्वारे प्रभात फेरी काढून झाल्यानंतर शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई यांच्या हस्ते फीत कापून शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक -2 चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना पहिलीची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पहिल्याच दिवशी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन, स्वरूप बदललेल्या, आकर्षक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा, सर्व सदस्य, सरपंच,
सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, गावातील लहान थोर, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावकरी आणि शिक्षक शिक्षिका या सर्वांच्या सहकार्यातून हा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहामध्ये पार पडला.