नूकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
संभाजी ब्रिगेडचे तहसिलदारांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यात अत्यल्प पावसामुळे शेतपिकांचे मोठे नूकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदार यांना सोमवार, दि. १४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जून व जुलै महिन्यामध्ये अल्पसा पाऊस झाला तसेच दि. १४ ऑगस्ट पर्यंत म्हणावा तेवढा पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, तुर, उडीद, मुग, कापूस, मका या सर्व पिकाची वाढ खुंटली असून पाण्याअभावी पिके करपत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पुर्वीचे अनुदान नुकसानीच्या प्रमाणात मिळालेले नाही व त्याचप्रमाणे पीक विमा ही मिळालेला नाही. सर्व जनावरांना चारा – पाणी उपलब्ध नाही. पिके करपत आहेत. या सर्व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी तणावात जगत आहेत. तरी सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक अनुदान द्यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व संपर्कप्रमुख डॉ.सुदर्शन तारक,संघटक शशिकांत कन्हेरे ,विभागीय अध्यक्ष राहुल वायकर मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, शहराध्यक्ष सिद्राम यादव, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मिसाळ, बी.व्ही.शिंदे, विद्यार्थी आघाडीचे सतिष कुंडगर, केशव टेहरे, समाधान मोरे, रोहन कुलकर्णी आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.