भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी भाऊराव प्रभाळे यांची एकमताने निवड.
बीड दि. १३ (प्रतिनिधी) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बीड जिल्हा कौन्सिलची बैठक आज बीड शहरातील पक्ष कार्यालयावर संपन्न झाली असून या बैठकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी कॉ. भाऊराव प्रभाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, बीड शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर जिल्हा कौन्सिलची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये जातीय-धर्मांध, भांडवल धार्जिण्या मोदी सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी- शेतमजूर, विद्यार्थी- युवक, महीला आणि एकूणच कष्टकरी कामगार देशोधडीला लागला असल्याने कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हान उभे असून येत्या काळात कम्युनिस्ट पक्षाला सक्षमपणे लढावे लागेल असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे यांनी केले. या बैठकीमध्ये भाजप हटाव – देश बचाव ही मोहिम राबविण्याबरोबरच राज्य कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा ठराव घेण्यात आला. या बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस पदी तरुण लढाऊ कार्यकर्ते कॉ. भाऊराव प्रभाळे यांची एकमताने निवड झाली असून ते गेवराई विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार राहतील असे ठरले. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास सदिच्छा देण्यात आल्या. या बैठकीला महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. महादेव नागरगोजे, कॉ. उत्तमराव सानप, कॉ. डी जी. तांदळे, कॉ. जोतिराम हुरकुडे, कॉ. विनोद सवासे, ॲड. अंबादास आगे, ॲड. नितीन रांजवन, कॉ. करुणा टाकसाळ, ॲड. फिडेल चव्हाण, कॉ. रामहरी मोरे, कॉ. आसाराम मुळे, कॉ. दत्ता भोसले, कॉ. सादेक पठाण सह अन्य जिल्हा कौन्सिल सदस्य उपस्थित होते.