नागापूर वाण धरणावरील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
परळी – सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परळी तालुक्यातील समाज बांधव आक्रमक होताना दिसत आहेत.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी परळी तालुक्यातून अनेक गावातील नागरिक सहभागी झाले होते.
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नागापूर येथील वाण धरणावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाऊस असतानाही समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले.वाण धरणात असलेल्या खंडोबा मंदिर येथे हे आंदोलन सुरु असून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला.आंदोलनादरम्यान उपस्थितांमध्ये ऊर्जा दिसून आली.
राज्य सरकार ने सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, आंतरवली सराटी घटनेनंतर मराठा समाज बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत,घटनेस जवाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर खटले दाखल करावेत. आंदोलकांच्या या प्रमुख मागण्या असून आपल्या मागण्यावर आंदोलक ठाम असल्याचे दिसून आले. आंदोलना दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले.वाण धरणावर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला आहे.